परिक्षांचे गोंधळ पुराण !!!

"शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी" - संत तुकाराम महाराज 

ज्यांना शिक्षण महत्त्वपूर्ण वाटते त्यांच्यासाठी परिक्षा तेवढ्याच महत्वाच्या असतात. शिक्षणासाठी परिक्षा असतात परिक्षेवर शिक्षण  नसते. त्यामुळे परिक्षा योग्य पद्धतीनेच होणे आवश्यक आहे. ज्यांना शिक्षण गरजेचे नसून फक्त निकाल लावायचा त्यांना परिक्षा नको असेच वाटणार परंतू शिक्षणाच्या ध्यासापोटी शिकणाऱ्यांना हा प्रश्न नाही. त्यामुळेच देशाचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी परिक्षा ऑफलाईन व्हायला हव्यात. शिक्षण क्षेत्राची होणारी वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी आज सजग राहणे आवश्यक आहे. मुळात परीक्षा संदर्भात केले जाणारे वाद विवाद नक्कीच विद्यार्थी हिताचे असला हवेत परंतु आज ही आपल्या देशात शिक्षणासंदर्भात लोकांमध्ये योग्य जाणीव निर्माण झालेली नाही हेच दुर्दैवाने म्हणावे लगेल. आजही काही निर्बुध्द राजकारणी लोक या क्षेत्राच्या आड आपले राजकीय हित साधण्याचा प्रयत्न करताना दिसतात. परंतु शिक्षण हे अत्यावश्यक आहे आणि ते योग्य मूल्यमापणाच्या आधारे योग्य रीतीने आणि प्रामाणिकपणे दिले जाने हे राज्यसंस्थेचे आद्य कर्तव्य आहे.  

ज्या व्यवस्थेत शिक्षणाच्या मूल्यमापणावरच प्रश्न चिन्ह उपस्थित होत असेल तर त्या शिक्षणाचे भविष्य काय असणार हे सांगायला कोणत्या जोतिष्याची गरज नाही. अशा लोकांच्या खांद्यावर जर देशाचे भविष्य सोपवायचे असेल तर त्या देशाचे भविष्य नक्कीच सुरक्षित नसेल हे नक्की. त्यामुळे देशाला समृद्ध आणि योग्य प्रगतिच्या दिसेने पुढे न्यायचे असेल तर शिक्षण क्षेत्रातील असा अवाजवी हस्तक्षेप दूर करून ही व्यवस्था समृद्ध करणे अत्यंत गरजेचे आहे. 

विशेष म्हणजे परीक्षा ह्या विद्याग्रहण किती योग्य रीतीने संपन्न झाले हे परीक्षणासाठी आहेत. ते जर चुकीच्या पद्धतीने आणि चुकीच्या धारणेतून केले जाणार असेल तर नक्कीच शिक्षणाचे उद्दिष्ठ अजूनही खूप दुरापास्त आहे असेच ह्या सगळ्या परिस्थितीवरून म्हणावे लागेल.  

Comments

Post a Comment